# अपुरे
वाट पहाता सख्या रे थकले गात्रं-गात्रं सारे,
जीव हा जळतो प्रेम-ज्वराने, लावली कशी आस रे
तुझ्या आठवणीत अंग-अंग शहारे,
रोमं-रोमं फुलती येता ओठी तूझे नाम रे
उमाळे उसासे आणि हुंकार सारे,
उष्ण श्वासांचे जणू उठती वादळ-वारे
आरक्त तरी लाजरे, करती कसले इशारे,
आज वेगळेच का भासती हे नयन असे बावरे
गंध तुझा वेडावतो तारुण्य परत बहरे,
संध्या समयी रंग प्रीतीचा नव्याने परत निखरे
विलगल्या ओठांत शब्द होता कापरे,
उमजुन घे भाव तू पाकळ्या गुलाबी चुंबून रे
अधीर झाले हे तन-मन तुझ्याच स्पर्शाने मोहरे,
दे घट्ट आलिंगन प्रिया आज होउ दे मिलन रे
जीर्ण होउन गळू लागले एक-एक वस्त्र रे,
आज का पेलवेना यौवनास शृंगाराचे अस्त्र रे
खेळती बटा ओल्या केसांच्या उघड्या पाठीवरे,
चोखाळती नव्या वाटा प्रेमाच्या निथळलेले थेंब रे
दिवस-रात्र तूच हवास सारे जीवन वाटते अपुरे,
कोसळते हर-एक सर, मज वर आता तूच सावर रे
©मनमित 2021
........
No comments:
Post a Comment