Friday, 25 December 2020

मराठी कविता

# एक आठवण

एक हल्कीशी झुळूक आली,
ओंजळीतील फुले विखरुन गेली l

क्षण तो मोहक तेव्हांच सरला,
परी एक आठवण सुगंधात न्हाली l

जीवन नाजूक जुईचे फूल,
द्यावी-घ्यावी चुक-भुल l

न जाणो परत कधी येईल,
हा वसंत असाच भरभरुन ll1ll

एक आठवण वहीच्या पानातून उलगडली,
जुनी जखम उसवून गेली l

कळ ती जीवघेणी क्षणात विरली,
पण यातना जन्माची देऊन गेली l

सुख हे अत्तराचा फाया जणू,
ठेवावा हृदयाच्या कुपीत दडवून l

न जाणो प्रेम-पाखरा परी,
तेही कधी जाईल भुर्र उडून ll2ll

पहिल्या नजरतेच जी मनास भावली,
ती स्वप्नपरीच जणू जीवनात आली l

ती नेहमी म्हणायची रडू-भांडू मनसोक्त प्रेम करु,
तू माझा अणि मी तूझी सर्व जगाला ओरडून सांगू l

सारखं आठवणींना कुरवाळत नको बसू,
जो पर्यंत सोबत आहोत मजेत जगू l

आणि एक दिवस आली तशीच गेली निघून,
मनात हळवी एक आठवण ठेऊन ll3ll
........

No comments:

Post a Comment